प्रतिशिर्डी शिरगाव साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
उरण:सुनिल ठाकूर
दिवंगत माजी आमदार प्रकाश देवळे यांनी स्थापन केलेल्या प्रतिशिर्डी शिरगाव श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती कार्यकारी विश्वस्त विभावरी देवळे-जाधव यांनी दिली.
उत्सवाची सुरुवात श्री साईबाबांच्या महाभिषेकाने झाली. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. दुपारी आयोजित 'स्वर ज्ञानेश्वरी' कार्यक्रमात गायिका ज्ञानेश्वरी गाडगे, तबलावादक पांडुरंग पवार, हार्मोनियमवादक कार्तिकी गाडगे आणि पंडित रमेश भुजबळ यांनी सुरेल सादरीकरण केले. त्यानंतर अभंगवाणी कार्यक्रमात गायक शंकर गिरी, तबलावादक पांडुरंग पवार, हार्मोनियमवादक अभय नलगे तसेच कोरस कलाकार किरण चोरमारे आणि सचिन जाधव यांनी संतवाणी व अभंगांचे सादरीकरण करून वातावरण भक्तिमय केले.
सायंकाळी श्री साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक मंदिर परिसरातून काढण्यात आली. पिंपरी येथील शिवाय ढोल पथक आणि गंधर्व बँडच्या निनादात हजारो साईभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत साईनामाचा जयघोष केला. मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट साई भक्त राकेश मुगळे यांनी केली होती. दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
महाआरतीस कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णाकुमार गोयल सपत्नीक उपस्थित होते. हिंदी सिने अभिनेते देव गिल यांनी दर्शन घेतले. प्रेमचंद मित्तल आणि वसंत ग्रुप यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उत्सवाचे नियोजन कार्यकारी विश्वस्त विभावरी देवळे-जाधव, तहहयात विश्वस्त रवी जाधव, विश्वस्त उमेश कविटकर, कल्पना कविटकर, संपत भोसले, दीपक जाधव, मंदिर व्यवस्थापक अनिल देवकर, अन्नछत्र व्यवस्थापक जयेश मुळे, राकेश मुगळे, यश जाधव आणि वरुण जाधव यांनी केले. विष्णू कदम, गणेश कपिले, सिद्धाजी माने, यांनी सहकार्य केले.