बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !
उरण : सुनिल ठाकूर - पनवेल तालुक्यातील आणि उलवे नोडमधील बामणडोंगरी गावची अविनाश धावजी नाईक आणि हेमलता अविनाश नाईक यांची कन्या अंकिता नाईक ही नुकतीच एम. एस. (मास्टर ऑफ सर्जरी) डॉक्टर झाली. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी तिचे घरी जाऊन पुष्पगुच्छ आणि 'सुखकर्ता' व 'परदेश प्रवासाची पंचविशी' ही पुस्तके भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, रामदास नाईक, अरुण नाईक, प्रीतम नाईक, उत्तम कोळी, अश्विन नाईक आदी उपस्थित होते. त्यांनीही तिचे अभिनंदन केले.
बामणडोंगरी गावचे तत्कालीन समाजसेवक दिवंगत धावजीशेठ गणा नाईक यांची अंकिता नाईक ही नात आहे, तर उरण-कंठवली येथील कीर्तनकार आणि नवी मुंबईत प्रसिद्ध असणारे चार्टड अकाउंटंट (सी. ए.) इ. ए. पाटील यांची ती भाची आहे.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "आगरी समाजातील मुली उच्चशिक्षण घेऊन नावलौकिक मिळवत आहेत. मुली शिकाव्यात यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करतोय आणि प्रोत्साहन देत आलो आहे. त्यामुळे आगरी समाजाची अंकिता नाईक ही तरुणी स्त्री-रोग तज्ज्ञ झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. मुलींचा सन्मान करण्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेतला आहे. एकेकाळी भांडणांसाठी प्रसिद्ध असलेल्या बामणडोंगरी गावची तिने मान उंचावली आहे. तिचे आजोबा धावजीशेठ नाईक हे काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांनी त्या काळात कॉंग्रेस पक्षाचा पाया भक्कम केला होता."
आगरी समाजातील तरुणी स्त्री-रोग तज्ज्ञ झाल्याने परिसरात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.