अष्टविनायक श्री लेण्याद्री देवस्थान संकलन : सुनिल ठाकूर पत्रकार

पुण्यापासून अंतर – 
श्री क्षेत्र लेण्याद्री हे अष्टविनायकापैकी एक देवस्थान असून येथील गणपतीस ‘श्री गिरीजात्मज’ या नावाने संबोधले जाते. हे ठिकाण पुणे शहरापासून सुमारे ९८ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. तसेच जुन्नर शहरापासुन उत्तरेस ७ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.

देवाची आख्यायिका –
माया सा भुवनेश्वरी देहाश्रिता सुंदरी। विघ्नेशं सुतमाप्तुकाम संहिता दुष्करम।।
तख्या भूत्प्रकट प्रसन्नवरदो तिष्ठतया। वंदे ह गिरीजात्मज परमजं तं लेखनादिस्थितम।।

अर्थ- ती मायारूपी जगन्माता,शिवपत्नी पार्वती जिने सौंदर्याला आपल्या देहात आश्रय दिला आहे. जिने पुत्र प्राप्तीसाठी कडक तप केले आणि अखेर श्री गणेशच तिला पुत्र प्राप्त झाला अशा ह्या गिरीजेच्या, पार्वतीच्या पुत्रास लेण्याद्री पर्वतवर स्थानापन्न झालेल्या शिवसुताला माझे वंदन असो.

हिमकन्या म्हणजेच शिवपत्नी पार्वती हिला श्री विनायकाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा होती. म्हणून तिने लेण्याद्रीच्या गुहेत बारा वर्षे कठोर तप केले. याकालावधीत माता पार्वतीने मातीची मूर्ती करून श्री विनायकाची पूजा व अनन्य भावे सेवा केली. माता पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ‘श्री गणेश’ बटुस्वरुपात माता पार्वतीच्या समोर प्रकट झाले आणि लेण्याद्रीमध्येच वास्तव्यास राहिले. श्री गणेशाच्या सर्व बाललिला याच लेण्याद्री डोंगराच्या परिसरात झाल्या. येथेच गौतमऋषींनी श्री गिरीजात्मजाचे सातवे वर्षी मौंजीबंधन केले. या बालगणेशाने यापरिसरात अनेक लीला करून बालासुर,  व्योमासुर, त्यांची धोकेबाज बहिण शतमहिषा, कमलासुर, मंजकासुर असे अनेक असुरांचा व दुष्टांचा संहार करून सज्जनांचे रक्षण केले. तसेच शेष, इंद्र, यम यांचे गर्वहरण केले आणि आपले अवतारकार्य संपल्यावर याच श्री क्षेत्र लेण्याद्रीमध्ये गुप्त झाले. गिरीजात्मज हा शब्द गिरीजा व आत्मज या शब्दापासून निर्माण झाला आहे. गिरीजा म्हणजे पार्वती व आत्मज म्हणजे पुत्र असा या शब्दांचा अर्थ होतो. अष्टविनायक क्षेत्रापैकी डोंगरावर असलेले आणि बौद्ध लेण्यांच्या सानिध्यातील एकमेव क्षेत्र म्हणजे “श्री क्षेत्र लेण्याद्री” आणि इथला विनायक म्हणजे “श्री गिरीजात्मज”. ‘श्री क्षेत्र लेण्याद्री’ हे अष्टविनायकामधील सहावे स्थान असून हे स्वयंभू स्थान आहे.  ‘श्री गिरीजात्मजाच्या' दर्शनाने व कृपाप्रसादाने कुटूंबातील, व्यवसायातील व आयुष्यातील अडचणी व संकटे दूर झाल्याचे भाविक भक्त सांगतात.

मंदिराची माहिती – 
पुणे जिल्ह्यातील उत्तरेस सर्वांच्या परिचित ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरापासून उत्तरेस ७ किलोमीटर अंतरावर ‘श्री क्षेत्र लेण्याद्री’ वसलेले आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत कोरलेल्या लेण्यांच्या समूहामुळे या भागास ‘लेण्याद्री’ या नावाने ओळखले जाते. लेण्याद्री येथे पुर्व ते पश्चिम अशा एकुण २८ लेण्या आहेत. त्यापैकी सातव्या क्रमांकाचे कोरीव लेणीत ‘श्री गिरीजात्मज’ गणेशाचे मंदिर असून मंदिराला एकूण साडेतीनशे पायऱ्या आहेत. मुख्य गाभाऱ्यासमोरील प्रशस्त सभामंडप असून सभा मंडपात कोणत्याही प्रकारचा खांब नाही. तसेच सभा मंडपाच्या बाहेर दोन पाण्याच्या टाक्यात असुन त्यांस वर्षभर थंड पाणी असते. सध्या त्या सुरक्षतेच्या कारणास्तव बंदिस्त केलेल्या आहेत.

वर्षभर साजरे होणारे सन व सोहळे –
‘श्री गिरीजात्मजाच्या’ दर्शनाकरिता देश-विदेशातून असंख्य भाविक याठिकाणी येत असतात. तसेच येथील निसर्ग सौंदर्यामुळे मोठ्या प्रमाणात निसर्गप्रेमी येत असतात. लेणी समूह आणि त्यावरील कोरीव कामाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी अनेक पर्यटक व 
अभ्यासक येत असतात. या येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना सेवा व सुविधा पुरविणेकरिता सण १९५५ मध्ये येथील गोळेगाव येथील ग्रामस्थांनी ‘श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टची’ स्थापना केली. या देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांना व पर्यटकांना विविध सेवा व सुविधा पुरविल्या जातात. यात प्रामुख्याने अल्पदरात निवास, महाप्रसाद, पिण्याचे शुध्द पाणी, पार्किंग, सुरक्षेकरीता सी.सी.टी.व्ही. कॅमेरे इत्यादी सेवांचा समावेश होतो. तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. देवस्थान ट्रस्टच्या वतीने वर्षभरामध्ये विविध उत्सव व पारंपारिक सण साजरे केले जातात. यात प्रत्येक महिन्यातील विनायकी चतुर्थी व संकष्टी चतुर्थी,तसेच अंगारकी संकष्टी चतुर्थी, भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थी उत्सव, माघ महिन्यातील श्री गणेश जयंती उत्सव, अखंड हरीनाम सप्ताह इत्यादी उत्सव साजरे केले जातात.

देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ-
ॲड.श्री. संजय रामदास ढेकणे – अध्यक्ष,
श्री. गोविंद यशवंत मेहेर- उपाध्यक्ष,
श्री. शंकर लक्ष्मण ताम्हाणे – सेक्रेटरी,
श्री. भगवान नाना हांडे – खजिनदार,
श्री. प्रभाकर रामचंद्र जाधव – विश्वस्त, 
श्री. मच्छिंद्र बाबुराव शेटे - विश्वस्त,
श्री. सुरेश मल्हारी वाणी - विश्वस्त,
श्री. प्रभाकर पिलाजी गडदे- विश्वस्त,
श्री. सदाशिव शंकर ताम्हाणे - विश्वस्त,
श्री. काशिनाथ दत्तात्रय लोखंडे - विश्वस्त,
श्री. विजय रामचंद्र वर्‍हाडी - विश्वस्त,
श्री. नंदकुमार जगन्नाथ बिडवई- विश्वस्त,
श्री. जयवंत ज्ञानेश्वर डोके - विश्वस्त,
श्री. कैलास लक्ष्मण लोखंडे - विश्वस्त,
श्री. जितेंद्र चंद्रकांत बिडवई - विश्वस्त,

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.