अष्टविनायक : श्री क्षेत्र ओझर देवस्थान संकलन : सुनिल ठाकूर पत्रकार


नमो जी आद्या ! वेद्प्रतीपाद्या !

जय जय स्वयंवेद्या !आत्मरुपा !!१!!

देवा तूचि गणेशु ! सकलार्थ मतीप्रकाशु !

म्हणे निवृत्तीदासू !अवधारि जो जी !!२!!

                   सर्व जगताचे आद्यकारण,सर्व वेदांचा कर्ता आणि निर्गुण,स्वयंप्रकाशी,आत्मरूपी आणि सकलमतिप्रकाशु मंगलमुर्ती मोरया हे सर्व आबालवृद्धांचे आराध्य दैवत! कोणत्याही शुभ प्रसंगाचा प्रारंभ श्री गजाननाच्या स्मरणानेच केला जातो. विघ्नासूर दैत्याचा संहार करणारा आणि संकटसमयी साऱ्या विघ्नाचे हरण करणारे हे दैवत आपल्या ह्र्दय-गाभाऱ्यात सदैव विराजमान असते.

                   श्री क्षेत्र ओझर हे गौरवशाली ऐतिहासिक व प्राचीन पार्श्वभूमी लाभलेले अष्टविनायकांनपैकी एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे.पश्चिमेस गिरिजात्मक लेण्याद्री व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेला गड शिवनेरी उत्तरेस संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराजांचे समाधी स्थळ असलेले ओतूर पूर्वेस ज्याच्या मुखातून वेध वदवले त्या श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रेड्याची समाधी स्थळ असलेले आळेगाव आणि कुकडीचा अथांग जलाशय थोपवून धरणारे यड्गाव धरण,दक्षिणेस विदेश संचार केद्र आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना आहे.आशा समृद्ध आणि आभिमानास्पद परिसर लाभलेला ओझर गाव.या सर्वांच्या मध्ये श्री गणेशाच्या मुकुटातील पुष्प-मकरंदा प्रमाणे शोभत आहे .या भक्तीचा सुगंध कुकडी माईच्या जलाशया बरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या श्री गणेशाच्या भक्तरुपी भ्रमरांबरोबर दाही दिशांना दरवळत आहे.

 

 

मंदिराविषयी

                     श्री विघ्नहर मंदिर हे पेशवेकाळात बांधलेले असून हे मंदिर वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट व विलोभनीय नमुना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार मुनिपुत्र आहे या चार मुनिपूत्रांच्या हातात चार वेगवेगळ्या वस्तू आहेत.पहिल्या मुनीपुत्राच्या व चार नंबर च्या मुनीपुत्राच्या हातात शिवलिंग आहे. तसेच दोन व तीन नंबर च्या मुनीपुत्राच्या हातात विणा धारण केलेला दिसत आहे.एक व चार नंबर च्या मुनिपुत्रावरून असे लक्षात येते कि गणराज हे आपल्या आईवडिलांना श्रेष्टत्व देतात. म्हणजे जे भक्त हे शिवपार्वतीची भक्ती करतात ते शिवभक्त म्हणजेज श्री गणराज भक्त सुद्धा होऊ शकतात.जो गणराज भक्त असतो तो आईवडिलांची सेवा करणारा आसावा असा बोध हे दोन मुनिपुत्र प्रथम द्वारावर पहिल्यांदाच गणेशभक्तांना आठवण करून देतात.

                     दोन व तीन स्थानावर जे मुनिपुत्र आहेत त्यांच्या हातात विणाआहेत.याचा अर्थ असा होतो कि माता सरस्वतीचे हे प्रतिक म्हणजे विणा आहे. सरस्वती ही बुद्धीची देवता तसेच संगीताची देवता आहे.मंदिरात प्रवेश करताना उंबरठ्यावर राक्षस कोरलेला आहे व त्याचा डोक्यावर शेष नाग आहे. त्यांच्यावर पुन्हा एक राक्षस आहे तो साक्षात राक्षस नसून एक वास्तू पुरुष आहे.या दोन मुनीच्या मधून प्रवेशद्वार सुरु होते याच्या सुरुवातीला वरच्या भागात कमान असून कमानीच्या मध्ये श्रीगणरायाला आवडणारे जास्वंदाच्या फुलाची वेली आहे.जास्वंदी क्रांतीचे प्रतिक आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर चार क्रमवार उतरत्या पायऱ्या आहेत. याचा अर्थ असा भक्तांनी मंदिरात आल्यावर राग,लोभ,मद,मत्सर हे चार अवगुण विसरावेत. हे ह्या पायऱ्या सांगत आहेत.

          श्री विघ्नहर मंदिर पूर्वाभिमुख आहे. ते बंदिस्त आहे.चारही बाजूनी उत्तम स्थितीत असलेले दगडी तटबंदी आहे.पूर्वेच्या महाद्वारातून आत प्रवेश केला कि,दोन उंच दगडी दीपमाळा आहेत.त्यावर त्रिपुरारी पौर्णिमेला दिपोत्सव साजरा करतात.मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारा पाशी दोन्ही बाजूने दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत. महाद्वाराच्या आत दोनबाजूंना २५-३०फुट लांबीच्या व ८ फुट रुंदीच्या ओवऱ्या आहेत. ओवऱ्यानां डौलदार कमानी आहेत.उजव्या बाजूच्या ओवरी खाली तळघर असून त्यात विघ्नहराची  पालखी,हंड्या,झुंबरे,इत्यादी साहित्य ठेवलेले आहे.महाद्वारात एक व आत एक असे सभामंडप आहेत.

             पहिल्या सभामंडपात प्रवेश करताच प्रथम दर्शन घडते ते मनोनिग्रह शिकणाऱ्या शमगुणी अशा प्रसंन्न कासवाचे सभामंडप आणि ओवऱ्या यांच्या मधून प्रदक्षिणा घालण्यासाठी पंधरा फुटी दगडी फरशीचा प्रदक्षिणा मार्ग तयार केलेला आहे.विघ्नहराला प्रदक्षिणा घालताना प्रदक्षिणा मार्गावर भैरवनाथाचे दर्शन घडते.कलीला या ठिकाणी मज्जाव करण्यास व भक्तांचे दर्शन निर्विघ्न पार पाडण्यास भैरवनाथ विघ्नहराच्या मंदिरात सदैव विघ्नहराकडे मुख करून विराजमान आहेत.प्रदक्षिणा मार्गामध्ये मांदार,शमी, कण्हेर, पारिजात,असे विघ्नहराला प्रिय असणारे वृक्ष आहेत. मंदिराच्या समोर दर्शन रांग मार्ग तयार केलेला असून त्यावर सावलीसाठी सभामंडप तयार केलेला आहे.मंदिरात प्रवेश केल्या नंतर दर्शन गाभारा व दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये प्रवेशद्वारात विघ्नहराकडे तोंड करून हातात मोदक घेतलेला मुषकराज यांची मूर्ती आहे.

                          दुसऱ्या गाभाऱ्यातून आत गेल्यानंतर तिसऱ्या गाभाऱ्यात विघ्नहराची पूर्णाकृती बैठी मूर्ती डौलदार अशा कमानीत आहे.कमानीला चांदीची मखर बसवलेली आहे.मूर्ती ही पूर्वेकडे तोंड केलेली आहे.ती डाव्या सोंडेची आहे. दोन्ही डोळ्यात मानके आणि कपाळावर हिरा असा थाट आहे. बेंबीत हिरा बसवलेला आहे.विघ्नहराच्या सर्वांगाला शेंदूर लावलेला आहे.विघ्नहराच्या दोन्ही बाजूला कमानीत रिद्धी-सिद्धी च्या पितळी मूर्ती आहेत.गाभाऱ्यात चारही बाजूंना छोटे छोटे कोनाडे असून त्यात पंचायतनाच्या मूर्ती आहेत.विघ्नहराचा मुकुट सोन्याने मढवल्यामुळे मूर्तीला एक वेगळीच अशी चकाकी व चमक दिसते.

 

 

पौराणिक कथा

                           पुरातन काळाची कथा हेमवती नावाची नगरी होती.तेथे अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता.राजा मोठा महत्वाकांक्षी,सत्ता व संपत्ती याचा लोभी होता.मोहाने माणसाला आपल्या ताकतीचा विसर पडतो,तसे अभिनंदन राजाच्या बाबतीत घडले.एकदा त्याला आपण इंद्र्पद मिळवावे असे वाटू लागले.इंद्र्पद मिळवायचे म्हणजे यज्ञ करणे जरुरीचे होते.मनात आले आणि सत्तेच्या लोभाने मदांध झालेल्या राजाने इंद्रपद प्राप्ती साठी यज्ञ सुरु केला.यज्ञात सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली जाणार होती.परंतु इंद्राचे राज्य घेण्यासाठी यज्ञ असल्याने इंद्रासाठी मात्र तशी आहुती दिली जाणार नव्हती.कळलाव्या नारदाला हे समजले.तो धावतच इंद्राकडे गेला.

                           इंद्राची प्रार्थना करून तो इंद्राला म्हणाला इंद्रदेवा तुम्हांला पृथ्वीवरची हकीकत कळली का? काय म्हणता नारदमुनी! मला तर कसलीही गंधवार्ता नाही इंद्राने उत्तर दिले.तेव्हा नारदाने अभिनंदन राजाच्या यज्ञाची व तो इंद्राचा या यज्ञात योग्य तो सन्मान करीत नसल्याची हकीकत वर्णन करून सांगितली.ती वार्ता ऐकली आणि इंद्र संतापला.त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली.अभिनंदन राजाला काय करू आणि काय नको असे त्याला झाले.इंद्राने काळाचे स्मरण केले.सत्कार्यात पवित्र गोष्टीत विघ्न आणणे ही काळाला अतिशय आवडणारी गोष्ट.काळाने तात्काळ विघ्नसुराचा अवतार धारण केला.विघ्नासूर पृथ्वीतलावर आला.सर्व वैदिक कार्याचा नाश करण्याचा सपाटा त्याने लावला.सर्व देव भयभीत झाले.तेव्हा सर्व देव गजाननाला शरण गेले.त्यावेळी गजाननाचे पराशर ऋषींच्या आश्रमात वास्तव्य होते .गजाननाने देवांना अभय दिले आणि पार्श्वपुत्राचे रूप घेतले.आपला मुलगा प्रत्यक्ष गजानन आहे.हे पार्श्वपुत्र व त्याची पत्नी दीपवत्सला ह्यांना ठाऊक नव्हते.तेव्हा आपल्या पुत्राला विघ्नसुराशी लढण्यास पाठवायला ते दोघे तयार नव्हते.शेवटी गजाननाने त्यांना सगळी हकीकत सांगितली व तो पार्श्वपुत्र विघ्नासुराशी युद्ध करण्यास निघाला.

                           गजानन व विघ्नासूर यांचे तुंबळ युद्ध झाले.काळरूपी विघ्नसुराने अनेक रूपे बदलली परंतु अखेरीस गजाननाने त्याला पकडले.विघ्नासूर गणपतीस शरण आला. त्याने अभय मागितले.गजाननाने त्याला सांगितले ठीक आहे.तुला जीवदान देतो,मात्र जेथे माझे भक्त माझी पूजाअर्चा ,स्मरण करत असतील तेथे तू असाता कामा नये’ विघ्नसुराने ते कबूल केले. परुंतु पुन्हा एक विनंती करीत म्हटले गजानना तुझ्या नावाप्रमाणे माझ नाव असाव अशी इच्छा आहे’

                           गजानन म्हणाला तथास्तु’ तेव्हापासून तो गजानन विघ्नेश्वर,विघ्नहर म्हणून ओळखला जाऊ लागला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस देवांनी नैऋत्येला विघ्नेश्वराची स्थापना केली ही घटना ओझर येथे घडली .तो ओझरचा विघ्नेश्वर आज संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे.          

 

 

 

 

 

दैनिक कार्यक्रम

मंदिर उघडण्याची वेळ पहाटे ५.०० वा.

अग्रपूजा व अभिषेक ५.१५ ते ७.००वा.

महाआरती सकाळी ७.०० वा.

पोथीवाचन ७.३० ते ८ .०० वा

मध्यान्ह आरती दुपारी १२.०० वा.

हरिपाठ सांयकाळी ७ ते ८ वा.

शेजारती रात्रौ १०.३० वा

मंदिर बंद वेळ रात्रौ ११.००वा

महाप्रसाद सकाळी १०.०० ते १.०० वा सायं ७.३० ते १०.३० वा.

 

दर्शनासाठी येणारी भाविक संख्या १ महिन्यामध्ये ६००००

संकष्टी चे ५००००

अगारखी ३ लाख

उत्सव भाद्रपद शु !! चतुर्थी ५ दिवस धार्मिक कार्यक्रम माघ शु चतुर्थी –गणेश जंयती अखंड हरीनाम सप्ताह.

       

      

 

 

                          श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ही संस्था या मंदिराची व्यवस्था चोख व अद्ययावत ठेवते.आजपर्यंत देवस्थान ट्रस्टने भाविकांच्या सुखसोईसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.भाविकांच्या सुखावह निवासासाठी ट्रस्टने आजपर्यंत चार भक्तनिवास इमारती,पुरेशी स्वच्छता गृहे एक भव्य प्रवेशद्वार व तीस हजार चौ. फुटाचे सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय  व डायनिंग हॉल ,एक अद्यावत भोजनगृह बांधलेले आहे .

            भाविकांच्या निवासाबरोबर जेवणाची सोय व्हावी म्हणून ट्रस्टने एक अद्यावत असे भोजनगृह बांधले असून यामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व सायं. ७.३०.ते रात्रौ १०.०० वा. पर्यंत २५/- रुपये सेवा शुल्क आकारून डाळ,भात,पुरी,भाजी,शिरा व खोबऱ्याची चटणी असा प्रसाद दिला जातो.वरील शुल्कामध्ये पोटभर भोजन दिले जाते.

                          प्रसाद बनविण्यासाठी  किराणा ,भाजीपाला इतर साहित्याला जो खर्च येतो तो खर्च देवस्थान ट्रस्टच्या निधीतून खर्च करावा लागतो.२४० आसनक्षमता असलेल्या भोजनगृहात अद्ययावत मशिनरीने प्रसाद बनविला जातो.कमी वेळात ते शक्य होते. रोज एका वेळेस दीड ते दोन हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात.त्यासाठी २१ ऑगस्ट २००४ रोजी एका भव्य अशा उपक्रमास सुरुवात झाली. तो म्हणजे “अन्नदान महाप्रसाद” योजना या योजनेमध्ये आपण रुपये २१०००/- देणगी देऊन १० वर्ष भक्तांना महाप्रसाद द्यावा असा आमचा मानस आहे.  

                          भक्तजन म्हणजेच जनार्दन समजून त्यांना तीर्थक्षेत्री भोजन अर्पण करण्याची आपली इच्छा ओझरच्या विघ्नहराच्या पवित्र स्थळी पूर्ण होण्याची व्यवस्था या “अन्नदान महाप्रसाद” योजनेद्वारे केली आहे.ज्या गणेश भक्तांना श्री चरणी असे अन्नदान करायचे आहे त्यांनी २१०००/- रुपये देणगी देऊन त्यातून ठराविक तिथीला त्या गणेशभक्तांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद दिला जाईल. आपण स्वत: पत्नी ,मुले,आईवडील व आपल्या इतर नातेवाईकांच्या जन्मदिनी,किवां लग्नाच्या वाढदिवशी,संकष्टी,विनायकी,अगारकी चतुर्थी व मंगळवार या श्री गणेशाच्या पवित्र व मंगलदिनी तसेच आपल्या आप्तेष्टांच्या स्मृती पित्यर्थ आपल्या तर्फे भाविकांना महाप्रसाद भोजन दिले जाऊ शकेल.तयार केलेल्या अन्नाचा अन्नदाना पूर्वी विघ्नहराला नैवद्य अर्पण केला जाईल. ज्या दिवशी आपले अन्नदान असेल,त्याच्या २ दिवस अगोदर आपल्याशी संपर्क केला जाईल. आपणास शक्य असल्यास एक दिवस आपली व आपल्या कुटुंबाची निवासाची सोय करण्यात येईल. अन्नदानाच्या दिवशी आपल्या हस्ते अभिषेक,आरती व आपला सत्कार करण्यात येईल. आजचे अन्नदाते म्हणून आपल्या नावाचा बोर्ड स्वागत कक्ष व महाप्रसादालयात लावण्यात येईल .आपण स्वत: प्रत्यक्ष उपस्थित राहून सेवा म्हणून भाविकांना स्वत:च्या हाताने प्रसाद वाटप करू शकता .या योगे भाविकांच्या आशिर्वादचे पुण्य आपल्या पदरी पडेल. आपणांस कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल.

            !अन्ने श्रीतानि भूतानि अन्नप्राण इति श्रुती !

            ! तस्मादन्न प्रकातण्यम अन्न हि परम हवि !!

                           म्हणजेच अन्नावरच प्राणीमात्र अवलंबून आहे.अन्न म्हणजेच प्राण आहे. असे श्रुति वचन आहे.दान सत्पात्री असावे असे आपण म्हणतो.अन्नदानही तसेच सत्पात्री व्हावे असे कुणालाही वाटणारच म्हणूनच तीर्थक्षेत्री आलेला देवभक्त हा अन्नदानासाठी सत्पात्र समजणे योग्य होय.

Popular posts from this blog

बामणडोंगरीची अंकिता नाईक झाली डॉक्टर! महेंद्रशेठ घरत यांनी घरी जाऊन केले अभिनंदन !

श्री अमित पळसकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी साजरा.