सिडको अधिकाऱ्यांनी केली शेलघरच्या विकासकामांची पाहाणी महेंद्रशेठ घरत यांनी गव्हाण-शेलघर रस्ता तातडीने पूर्ण करण्याची केली मागण
उरण: सुनिल ठाकूर शेलघरमध्ये भव्यदिव्य साई मंदिराची उभारणी होत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू ठेवली आहे. त्यामुळे ते लवकरच आकाराला येईल. त्यामुळे साई मंदिरात भाविकांना जाणे सुलभ व्हावे, यासाठी आज सिडको अधिकाऱ्यांसोबत महेंद्रशेठ घरत यांनी शेलघरचा दौरा केला. विकासकामांबाबत काही पर्याय सुचवले. तसेच शेलघर-गव्हाण रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिडकोचे सहायक कार्यकारी अभियंता भूषण पाटील म्हणाले, "शेलघरच्या तलावाला भिंत टाकून बाजूने साईभक्तांसाठी रस्ता तयार करता येणे शक्य आहे. त्यासाठी आम्ही प्राथमिक स्वरूपात कामाला सुरुवात केली आहे, लवकरच हा प्रस्ताव सिडकोच्या वरिष्ठांकडे पाठवून त्याला मंजुरी मिळाल्यावर ते काम मार्गी लागेल."
शेलघर-गव्हाण अंडरपास रस्त्याच्या कामाविषयी सिडकोचे सहायक कार्यकारी अभियंता निरज महेश म्हणाले, "रेल्वेमुळे आमचे काम थोडे रखडले आहे. तिथे खडक असल्याने मशीन लावून ते फोडावे लागते, परंतु रेल्वेचे अधिकारी ते काम करू देत नाहीत. तरीही आम्ही एका बाजूचे काम एक महिन्यात पूर्ण करू. रेल्वेच्या असहकार्यामुळेच कामात दिरंगाई झाली आहे."
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "शेलघर हे नवी मुंबई, रायगडमध्ये सुनियोजित आणि स्वच्छ गाव आहे. परिस्थितीनुरूप सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरून शेलघरचा विकास केला आहे. आता उर्वरित जी कामे शिल्लक आहेत, ती सिडकोच्या माध्यमातूनच करून घेणार, त्यासाठी सिडकोसोबत संघर्ष करावा लागला तरी चालेल."
यावेळी गव्हाणचे माजी उपसरपंच सचिन घरत आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.