सर्वांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेताळेश्वराकडे महेंद्रशेठ घरत यांनी घातले गाऱ्हाणे! पनवेलच्या डॉक्टरांसह 200 जणांच्या चमूला महेंद्रशेठ घरत यांनी घडवली जलदुर्गाची सफर!
सुनिल ठाकूर : सकाळी साडेआठची वेळ... उरण मोरा जेटीवर चक्क तीन लॉंच सज्ज...एका लॉंचमध्ये पनवेलमधील डॉक्टर्स आणि दोन लॉंचमध्ये एम. जी. ग्रुपचे सहकारी रविवारी गेले होते खांदेरी- उंदेरी या जलदुर्गावर. 17 व्या शतकातील हा जलदुर्ग पाहण्याची सुमारे दोनशे जणांच्या चमूला आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी संधी दिली. अथांग समुद्रात पसरलेल्या खांदेरी-उंदेरीला वेताळेश्वराचे दर्शन महेंद्रशेठ घरत यांनी रविवारी (ता. २३) घडवले.
यावेळी कोळी समाजाच्या पेहरावात मोरा जेटीवरून प्रवासाला सुरुवात होताच ओंकार स्वरूपा... या गणरायाच्या अभंगाने गायक नाना गडकरी यांनी गायनाला सुरुवात केली. त्यानंतर स्वतः महेंद्रशेठ घरत यांनी कोळी गीते, मैत्रीवर आधारित बहारदार हिंदी गाणी गाऊन एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांसोबत धमाल नृत्य केले.
यावेळी साडेतीन तासांच्या सागरी प्रवासानंतर खांदेरी-उंदेरी जलदुर्गावर ब्रास बॅंडच्या तालावर, गुळाल उधळीत नाचत जाऊन महेंद्रशेठ घरत यांनी वेताळेश्वराची विधिवत पूजा केली. त्यानंतर सर्वांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेताळेश्वराकडे गाऱ्हाणे मांडले. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजन केले.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "आमच्या सहकारी मित्रांना घेऊन मी गेली पाच-सहा वर्षे वेताळेश्वराच्या दर्शनाला येतो. यंदा डॉक्टर्स मंडळींना घेऊन गेलो होतो. दरवर्षी नवीन सहकारी जोडले जात आहेत. सर्वांना आनंद मिळावा हीच माझी भूमिका आहे. सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला, त्यामुळे पर्यटनाची ही परंपरा कायम राखली जाईल."
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे 50 डॉक्टर्स खांदेरी उंदेरी या जलदुर्गावर गेले होते. संघटनेचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, खजिनदार डॉ. संदेश बहाडकर आणि त्यांचे सहकारी होते. यावेळी डॉ. मोकल म्हाणाले, "आम्ही पहिल्यांदाच खांदेरी उंदेरीला गेलो होतो. दुर्ग स्वच्छता मोहीम हा आमचा हेतू होता. महेंद्रशेठ घरत यांनी आमचे उत्तम नियोजन केले होते. त्यांचे खरोखरच अफलातून व्यक्तिमत्त्व आहे. आम्हा डॉक्टर्स मंडळींना दुर्ग स्वचछतेसोबत त्यांच्यामुळे खूप आनंद मिळाला. आम्ही सर्वांनी मस्त एन्जॉय केले. सागरी किल्ला पाहून आम्ही भारावून गेलो, परंतु काही ठिकाणी किल्ल्याची तटबंदी तुटल्याने त्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने जातीने लक्ष द्यायची गरज आहे. त्यामुळे पर्यटनही बहरेल आणि रोजगारही उपलब्ध होईल."
"2019 पासून नोव्हेंबर महिन्यात खांदेरी- उंदेरीला जाण्याची परंपरा सुरू केली. वेताळेश्वराच्या दर्शनाने खूप प्रसन्न वाटते, अथांग सागराच्या कुशीत वसलेल्या वेताळेश्वराची आगरी-कोळी समाजावर नेहमीच कृपादृष्टी राहिली आहे. माझ्या आयुष्यातील अनेक कार्य निर्विघ्नपणे पार पडली आहेत," असेही यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी अभिमानाने सांगितले.
यावेळी प्राध्यापक प्रमोद कोळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.