एलटीटी स्थानकात हल्दीरामचे 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'प्रवाशांना २४ तास मिळणार सेवा
उरण (सुनिल ठाकूर ): छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंतर आता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसवरील पहिले आणि मुंबईतील दुसऱ्या 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' चे उद्घाटन हल्दीरामच्या सहकार्याने केले. या उद्घाटन प्रसंगी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच हल्दीरामचे संचालक नीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.
हे रेस्टॉरंट वापरातून काढून टाकलेल्या रेल्वे डब्यात तयार केले आहे. ज्याला बोगी वोगी असे नाव देण्यात आले. या रेस्टॉरंटमध्ये ४० जणांना बसण्याची सोय असून प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येतो. सीएसएमटीवरील रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू झाल्यापासून आजतागत हजारो प्रवाशांनी यामधील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर रेस्टॉरंट सुरू करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रेस्टोरंट ऑन व्हील्स' सुरू झाले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर येथील 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'ची उत्तमरीत्या रंगरंगोटी केली गेली आहे. तसेच खाद्यपदार्थाच्या किमती कंत्राटदाराने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निश्चित केल्या आहेत. १० टेबलसह ४० जणांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांना शाकाहारी आणि मांसाहारी असा दोन्ही जेवणांचा आस्वाद घेता येणार आहे. यापूर्वी हल्दीरामने नागपूर येथे रेस्टॉरंट ऑन व्हील्स ही संकल्पना सुरू केली होती आता त्याचा विस्तार करण्यात आला असून एलटीटी येथे मुंबईतील दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून सुद्धा मध्य रेल्वेचे प्रवाशी खाद्य पदार्थ ऑर्डर करू शकतात. ही सेवा प्रवाशांसाठी रात्रभर उपलब्ध राहणार आहे.
यावेळी हल्दीरामचे संचालक नीरज अग्रवाल यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दलचा उत्साह व्यक्त केला, ते म्हणाले, “हल्दीराम्समध्ये, आम्ही विशिष्ट आणि अविस्मरणीय जेवण तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत. रेल्वे-थीम असलेल्या या रेस्टॉरंट मध्ये आपण स्वादिष्ट अन्नाचा आस्वाद घेऊ शकतो तसेच या ठिकाणी आम्ही प्रवाशांना २४ तास दिवस रात्र अविरत सेवा देणार आहोत.”